Tuesday, 28 March 2017

ऋतुचर्या - ओळख

लहानपणी दिवाळीला पहाटे अभ्यंगस्नान करायला आई उठवायला यायची तेव्हा जाम राग यायचा. एवढ्या थंडीमध्ये उठून अंगाला तेल, उटणे लावून घासून रगडून आंघोळ का करायची हा प्रश्न पडायचा. आपल्या पुर्वजांनी हे असले उद्योग का लावून ठेवले असा विचार येऊन खूप वैताग व्हायचा. पण पुर्वजांनी सांगितलंय तर त्यामागे काही काही ना कारण असेलच असं सांगून आई मोकळी व्हायची पण प्रश्न मात्र अनुत्तरीतच राही.
अशा एक ना अनेक चालीरीती व त्या लावून ठेवण्यामागील वैज्ञानिक कारणे या सर्वांचं विवेचन आयुर्वेदाने केलेलं आहे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये ठराविक आहारविहाराचे  वेगवेगळे नियम व त्यामागील या विचारांबद्दल अधिक जाणून घेऊयात.



सूर्याभोवती परिभ्रमण करताना पृथ्वीवर विविध बदल घडत असतात. ही परिक्रमा पृथ्वी ३६५ दिवसात पूर्ण करते यालाच "वर्ष" म्हणतात. या एका वर्षात ६ ऋतू असतात ते पुढीलप्रमाणे, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म. या एका वर्षात २ अयन असतात. या अयनांमध्ये या ६ ऋतूचं विभाजन पुढीलप्रमाणे केले जाते.

उत्तरायण-
दिवस मोठा रात्र लहान.
उष्णता व रुक्षता वाढत जाते, त्यामुळे बलहानी होते. (अग्नी व वायू तत्वाच्या गुणांमध्ये वाढ होते)
शिशिर वसंत व ग्रीष्म या ऋतूंचा या अयनांत समावेश होतो.
दक्षिणायन-
दिवस लहान व रात्र मोठी असते.
सोम तत्वाच्या गुणांमध्ये वाढ होऊन शीतता व स्निग्धता वाढत जाऊन क्रमाक्रमाने बलवृद्धी होते.
वर्षा,शरद,हेमंत या ऋतूंचा या अयनांत समावेश होतो.


 या सहा ऋतूंचे आणि अयनांचे शरीरावर व शरीरस्थित त्रिदोष, धातू, ईत्यादी सर्व घटकांवर परिणाम होत असतात. या परिणामांना लक्षात घेता जर आपण बदलत्या ऋतूंनुसार आहारविहार आचरला नाही तर त्यांमुळे त्रिदोषांमधे असमतोल निर्माण होऊन विविध व्याधी लक्षणांची निर्मिती होते.
प्रत्येक ऋतूनुसार कुठला आहारविहार करावयाचा याचे वर्णन आयुर्वेदाने इथंभूत केले आहे व त्याला "ऋतुचर्या" असे म्हणतात.

ऋतुचर्या वर्णन करताना आहाराचा प्रामुख्याने विचार केलेला आहे, कारण आहाराने शरीर घडते व बिघडते सुद्धा.तसेच जर आहार योग्य नसल्यास व ऋतूंच्या बदलत्या परिणामांची त्यासोबत सांगड घातली गेल्यास त्याचे सखोल दुष्परिणाम शरीरावर होऊन व्याधी उत्पत्ती होते. उदाहरणार्थ - ग्रीष्म ऋतूत किंवा उन्हाळ्यात तळलेले, तिखट, मसाल्याचे, पदार्थ खाल्ले तर लगेच अम्लपित्ताचा त्रास होतो.
यावरून कळतं कि ऋतूंनुसार आहारात बदल करणे किती आवश्यक असतं.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडत असेल कि आपण जे सण साजरे करतो त्या प्रत्येक  सणाला  काही विशेष खाद्यपदार्थांचे महत्व आहे, जसे दिवाळीला पुरणपोळी, संक्रांतीला तिळगुळ, अक्षयतृतीयेला पंचामृत आणि चिंचवणे,पन्हे, इ.
या खाद्यपदार्थांना त्याच एका ठराविक सणाला खाण्यामागे केवळ विज्ञान आहे. आणि हे विज्ञान आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहे. सर्व सण हे विशिष्ट ऋतूंमध्ये येतात व त्या त्या ऋतूंमध्ये त्या सणाला केल्या जाणाऱ्या या विशेष खाद्यपदार्थांचे आरोग्यदायी फायदे आपल्या शरीरास मिळावे हा एकमेव उद्देश्य त्यामागे आहे.

ऋतूंचा आणि पंचकर्माचा देखील घनिष्ट संबंध आहे. ज्यावेळी अयोग्य आहारविहार केल्याने शरीरगत त्रिदोष असंतुलित होऊन व्याधीनिर्मिती होते त्यावेळी हे वाढलेले दोष शरीरातून पंचकर्माद्वारे काढून टाकावे लागतात.
वाढलेला कफ दोष - वसंत ऋतू (वमनाद्वारे )
वाढलेला वात दोष  - वर्षा ऋतू  (बस्तीद्वारे)
वाढलेला पित्त दोष  - शरद ऋतू ( विरेचनाद्वारे)
अशाप्रकारे असे हे वाढलेले दोष पंचकर्म करून त्या त्या ऋतूंमध्ये काढले जातात. पण हे दोष फक्त दुष्ट
अवस्थेत, वाढलेले असतानाच काढावेत असे नसून आयुर्वेदाने वर्षातून एकदा तरी सर्व पंचकर्म करून संपूर्ण शरिशुद्धी करून घ्यावी असा उपदेश केला आहे.

तर असा ऋतुचर्या व आपले आरोग्य / अनारोग्य  यांचा घनिष्ट संबंध आहे.

आमच्या पुढील लेखांमध्ये या विविध ऋतूंमध्ये काय खावे व खाऊ नये तसेच इतर कोणती काळजी घ्यावयाची याचे सविस्तर माहिती घेऊयात.


No comments:

Post a Comment