Friday, 5 May 2017

आयुर्वेदानुसार सर्व आजारांचं मूळ – आम


खुप औषधोपचार, वेगवेगळया प्रकारच्या चिकित्सा घेऊनही बरेचदा आजार हे थोड्या कालावधीनंतर परत डोके वर काढतात.औषधोपचारानंतर तेवढ्यापुरता आराम वाटून परत वातावरणातील थोड्याशा बदलाने किंवा खाण्यापिण्याच्या बदलाने पुन्हा त्रास होण्यास सुरुवात होते.

कधी कधी तर आजारी नसतानाही अंग गळुन गेल्यासारखे, थकल्यासारखे, शरीर जड असल्यासारखे वाटते. उत्साह वाटत नाही, शौचास साफ होत नाही, तोंडाला चव लागत नाही,अशाप्रकारची छोटी छोटी लक्षणे व्यवहारात अनुभवली जातात, पण त्याकडे दुर्लक्ष देखील केले जाते.

हीच छोटी छोटी लक्षणे आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष देऊन त्याची नीट हवी तशी काळजी घेण्याची गरज आहे हे सांगणाऱ्या सूचनाच असतात.पण आपण त्यांकडे दुर्लक्ष करून शरीराची व पर्यायाने आरोग्याची हेळसांड करतो व नंतर मोठ्या चिवट आजारांना बळी पडतो.


विरुद्धान्न सेवन(http://www.ayurbeej.in/2017/04/blog-post.html,) अतिमात्रेत आहारसेवन, जेवणे व झोपण्याच्या वेळा अनियमित असणे, सतत मानसिक ताणतणाव असणे, व्यसनाधीनता, नियमित व्यायामाचा अभाव,इ कारणांमुळे पचनशक्ती कमी होऊन अग्निमांद्य निर्माण होतं. या अग्निमांद्यामुळे जे ही खाल्लं ते नीट न पचता त्या पचनक्रियेतील आहाररसापासून  आम नावाचा विषारी पदार्थ तयार होतो व हाच आम वर उल्लेखित थकवा, उत्साहरहितता इ लक्षणांची निर्मिती करतो.कमी मात्रेत या लक्षणांची व दुर्लक्षित केल्यास मोठ्या आजारात रूपांतरण करतो.

आयुर्वेदानुसार त्रिदोष, व सात धातू ( रस,रक्त,मांस,मेद,अस्थी,मज्जा,शुक्र) हे शरीराचे धारण व पोषण करतात.या सप्तधातू, व त्रिदोषांचे आरोग्य राखण्यास अत्यंत मोलाचे योगदान असते. व या दोघांचे ही पोषण हे आपण खाल्लेल्या आहारातून जो आहाररस तयार होतो त्यांपासून होते. म्हणजेच निरोगी आहाररस हा सप्तधातू व शरीरपोषण करतो त्यामुळे शरीरास टवटवीतपणा व मनास चैतन्य वाटते.

परंतु ज्यावेळी हा आम आहाररसासोबत शरीरात शोषला जातो त्यावेळी सप्तधातू व त्रिदोष मालिन होऊन ते सामधातु (धातू+आम) व सामदोष  (त्रिदोष+आम) रूपांतरित होऊन हळूहळू व्याधी निर्मिती करण्यास सुरु करतात.
म्हणूनच आयुर्वेदाने आम यास सर्व आजारांचे मूळ कारण मानले आहे.

जो धातू बिघडेल किंवा ज्याच्या कार्यात आमामुळे अडथळा येईल त्यासंबंधित आजार निर्माण होतात.
उदाहरणार्थ, मेद धातू प्राकृत असला की मनुष्याचे शरीर सुडोल दिसते, परंतु या मेद धातू चा अग्नी मंद झाला की मेदनिर्मिती प्राकृत न झाल्याने किंवा अतिमात्रेत झाल्यामुळे व्यक्तीस स्थौल्य (लठ्ठपणा) येते. हे झाले स्थूलस्वरूपातील उदाहरण, याचेच सूक्ष्म स्तरावरील उदाहरण म्हणजे, हा अतिरिक्त मेदधातू रक्तवाहिन्यांमध्ये देखील साठून राहतो, व हळूहळू त्या वाहिन्यांची पोकळी कमी होऊ लागते (atherosclerosis ). या प्रकारच्या अडथळ्यांमुळे, जर एखाद्या अवयवास आवश्यक तेवढा रक्तपुरवठा नाही झाला तर त्या अवयवाच्या कार्यात व्यत्यय येऊ शकतो.
यावरून आपल्या लक्षात येईल की आम या संकल्पनेचा आवाका किती मोठा आहे, व वेळीच यासाठी पावले उचलले नाही तर मोठ्या आजारांना आमंत्रण देण्यासारखे हे असते.

असा हा आम जो पर्यंत आपल्या शरीरात आहे तो पर्यंत आजार हे होतच राहणार. तेव्हा लाक्षणिक चिकित्सा (symptomatic treatment)  न घेता आपली प्रकृती परीक्षण अनुभवी आयुर्वेद तज्ज्ञांकडून करून घेऊन या आमासाठी व त्यामुळे निर्माण झालेल्या आजारासाठी कायम स्वरूपाची चिकित्सा करून घेणं महत्वाचे आहे. 

No comments:

Post a Comment