Monday 16 October 2017

दिवाळीतील अभ्यंगाचे महत्व. कसे करावे अभ्यंग?



दिवाळी म्हंटली कि सगळयांना एक वेगळाच उत्साह संचारतो. आकाशदिवे, रांगोळ्या, फटाके, फराळ, पुरणपोळी, इत्यादींची रेलचेल सुरु होते. पण या सर्व धामधुमीमध्ये एका गोष्टीचा लहान मुलांना फार कंटाळा असतो आणि ते म्हणजे पहाटेचे "अभ्यंगस्नान". फक्त लहानच काय तर आजकालची तरुणपिढीदेखील अभ्यंगस्नानास सासुरवास अशा नजरेने बघतात. का बरे आपल्या पूर्वजांनी पहाटेच्या गारठ्यात  उठून अंगाला तेल उटणे लावून स्नान करण्याचा हा प्रघात घालून ठेवला असेल?

चला तर या अभ्यंगस्नानाचे वैज्ञानिकदृष्ट्या असणारे महत्व जे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी ओळखून सांगून ठेवले आहे ते जाणून घेऊयात.

दिवाळी हा सण हिवाळ्यात (http://www.ayurbeej.in/2016/04/diet-and-lifestyle-as-per-ayurveda-in.html ) येतो. यावेळी वातावरणातील शीतता (थंडपणा) वाढून त्वचा रुक्ष व कोरडी होते. यावेळी भेगा पडणे, त्वचा काळवंडणे, खाज सुटणे, इत्यादी तक्रारी सुरु होतात. शरीरातील वात दोषाचे (वातदोषhttp://www.ayurbeej.in/2015/12/vata-dosha-leader-of-tridosha.html)  प्राबल्य वाढू लागते, म्हणून या ऋतूत दिवाळी सणांतील अभ्यंगस्नानास अत्यंत महत्व आहे.


संपूर्ण शरीराला तेल लावून ते पूर्ण शोषले जाईपर्यंत चोळणे याला अभ्यंग म्हणतात. तेल हे स्वस्त, सहजतेने उपलब्ध तसेच सहज शरीरात शोषले जाणारे असल्याने त्याचा वापर अधिक केला जातो. तसेच तेल हे वातदोष कमी करण्यास सर्वात उपयुक्त असल्याने तेलाचा वापर प्रशस्त ठरतो, यामुळेही अभ्यंगास तैलाभ्यंग असेही नाव दिले गेले आहे. आयुर्वेदाने ऋतूनुसार, स्वस्थ व्यक्तींसाठी नित्य अभ्यंगाचा निर्देश केला आहे, परंतु काळासोबत तसेच अज्ञानामुळे ह्या गोष्टीचे महत्व कमी होऊ लागले व अभ्यंगास केवळ दिवाळीपुरतेच महत्व राहिले.
अभ्यंगविधी - अभ्यंग ही एक शास्त्रोक्त विधी आहे व त्याचे अपेक्षित लाभ या विधीस योग्यरित्या केल्यास अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात.

अभ्यंग करताना पुढील बाबींकडे विशेष लक्ष द्यावे- 

                                                                                 
१) अभ्यंग हे शक्यतोवर संपूर्ण शरीराचे करावे पण जर शक्य नसेल तर मुख्यतः शिरोभागी, हात व पायांवर करावे.

२) शिरोभागी अभ्यंग करताना अगदी कोमट तेलाचा वापर करावा.

३) हात व पायांवर सहन होईल इतके गरम तेलाचा वापर करावा.

४) दीर्घाकार अवयव म्हणजेच हात, पाय, पाठ, यांच्यावर अनुलोम दिशेने म्हणजेच वरून खाली अशा दिशेने अभ्यंग करावे.

५) संधिस्थानी  ( joints ) म्हणजे खुम्बा (elbow joint ), गुडघा (knee joint ), घोटा (ankle joint ), खांदा (shoulder joint ), ठिकाणी वर्तुळाकार पद्धतीने अभ्यंग करावे.

६) अभ्यंगाचा मुख्य हेतु अवयवांमधील, पेशींमधील, संधींमधील, वाढलेला वाट दोष कमी करून त्यांच्या प्राकृत गतीस उत्तेजना देणे तसेच त्यांना बळकटी देणे हा आहे.

अभ्यंग किती वेळ करावे?

वरील सर्व अवयवांना साधारणतः २ ते ३ मिनिटे अभ्यंग करावे यानुसार जवळपास ३५ ते ४० मिनिटे अभ्यंग करणे गुणकारी ठरेल.

लाभ -

१) अभ्यंगाने म्हातारपण उशिरा येते, म्हणजेच हे तारुण्यवर्धक आहे.

२) अभ्यंग हे श्रमहर म्हणजेच थकवा दूर करणारे आहे.

३) रक्ताभिसरण वाढवते.

४) वातदोष कमी करून शरीरातील रुक्षता कमी करते.

५) हाडांना बळकटी आणून शरीर दृढ बनवते.

६) झोप चांगली येते त्यामुळे अनिद्रेत अतिशय उपयुक्त.

७) त्वचा मृदू, कोमल, सुरकुत्यारहीत बनवते. त्वचा शुद्ध होऊन वर्ण उजळतो.

अभ्यंगानंतर उटणे लावून शरीर चोळण्याची प्रथा आहे. हे उटणे म्हणजे औषधी द्रव्यांचे मिश्रण होय. आयुर्वेदात यास उदवर्तनअसे म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत.

१) रुक्ष उदवर्तन- स्थौल्यादी व्याधींमध्ये तेल ना चोळत फक्त औषधी चूर्ण शरीरास मेद कमी करण्याकरिता चोळणे यास रुक्ष उदवर्तन म्हणतात.

२) स्निग्ध उदवर्तन - कृश व्यक्तींची चिकित्सा करताना आधी तेल लावून चोळावे असे शास्त्रात सांगितले आहे. स्निग्ध उदवर्तन स्वस्थ व्यक्तींनीदेखील नित्यनेमाने करावे. दिवाळीत जे अभ्यंगस्नान करताना जे केले जाते ते स्निग्ध उद्ववर्तनच होय.

लाभ-

१) उदवर्तन हे कफ व वातशामक आहे.

२) शरीरावयव दृढ व मजबुतहोतात.

३) अतिरिक्त मेदाचे विलयन करते म्हणूनच स्थौल्यात उपयोगी.

४) त्वचेची शुद्धी होऊन वर्ण सुधारतो.

५) रक्ताभिसरण सुधारते. त्वचा कोमल, मृदू होते.

६) रोमकूपे स्वच्छ होतात.

७) घामाने उत्पन्न झालेल्या मलाने निर्मित दुर्गंधी, कंडु, दूर होतो.

 तर अशा या आरोग्यदायी अभ्यंगस्नानाचा कंटाळा ना करता, त्याचे विज्ञान व त्यामागील महत्व जाणून घेऊन या दिवाळीत तसेच संपूर्ण वर्षभरात स्वतःच्या शरीराला या बहुगुणी अभ्यंगस्नानाची रोज भेट घडू द्या.
सर्वांना आयुर्बीज कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.




No comments:

Post a Comment